शकुन- अपशकुन भाग १
लोकहो,
काही दिवसांपूर्वी, खरे तर काही महिन्यांपूर्वी आमच्या जातक कु. सुजाता नेहरे यांनी शकुन- अपशकुनांबद्दल आम्ही लिहावे अशी मागणी केली होती. तेव्हा आम्ही त्यांना ’हो हो’ म्हटले होते. पण शकुनांबद्दल लिहिण्याचा योग आज आला. प्रत्येक गोष्टीची वेळ यावी लागते हे खरे आहे. असो.
भविष्यकथनात शकुनाचे खूप महत्व आहे. गुरूवर्य कृष्णमूर्तींनी शकुनाचा वापर अनेकदा भविष्यकथनासाठी केलेला आहे. "सभोवताली घडणारी प्रत्येक घटना जातकाचे भविष्य सांगत असते", या विधानाची प्रचिती वारंवार येते.
त्यामुळे ज्योतिषांने नुसतेच बारा ग्रह, बारा राशी आणि सत्तावीस नक्षत्रे आणि २४९ सब न पाहता, आजूबाजूस काय घडत आहे याकडेही लक्ष द्यावे. निसर्ग आपल्याला प्रत्येक गोष्ट सांगत असतो, मार्गदर्शन करत असतो, फक्त ते समजून घेण्याच्या जाणीवा बहुतेकांकडे नसतात.
ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, " पैलतोगे काऊ कोकताहे... शकुन गे माये सांगताहे"
प्राचीन ग्रंथांमधून अनेक शकुन वर्णिलेले आहेत. पण त्यातील अनेक शकुन आजच्या शहरी जीवनात अनुभवास येणे दुरापास्त आहे. उदाहरणार्थ,
महत्वाच्या कामासाठी निघाले असतांना, डोईवर भरलेला पाण्याचा हंडा घेऊन एखादी सवाशिण येतांना दिसली तर कार्यसिद्धी होते.
किंवा समोरून हत्तीची अंबारी येतांना दिसली तर ते आत्यंतिक शुभ असतं. वगैरे.
आता शहरात अशा प्रकारचा अनुभव किती येईल? जवळपास अशक्यच.
त्यामुळे शकुन हे स्थलकालपरत्वे बदलत असतात. त्या त्या काळातल्या गोष्टींमधून संकेत मिळत असतात.
सभोवताली घडणार्या घटनांचा योग्य अन्वयार्थ लावता आला, तर शकुनातून देव म्हणा किंवा निसर्ग म्हणा आपल्याला बरेच काही सुचवत असतो त्याने थक्क व्हायला होतं.
अशाच काही आजच्या काळातील शुभ आणि अपशकुनांची उदाहरणे.
आमच्या शेजारचे एक गृहस्थ एका सायंकाळी घामाघूम होऊन आमच्याकडे आले. त्यांचे पैशाचे पाकीट मिळत नव्हते. त्यात जवळजवळ अडीच हजार रुपये रोख आणि तीन बँकांची क्रेडीट कार्डे होती. ते कुठे असेल? हरवले असेल की कोणी मारले असेल? हे त्यांना उमगत नव्हते म्हणून ते आमच्याकडे आले आणि हा प्रश्न विचारला.
तेवढ्यात आमची कन्या 'स्वरांगी' तिच्या नवीन चपला घालून आम्हाला दाखवायला आमच्या कन्सलटेशनच्या खोलीत आली. आणि "बाबा, माझ्या चपला कशा आहेत?" असे आम्हाला विचारले. आम्ही हा शकुन समजून त्या गृहस्थांना त्यांच्या चपलांच्या रॅकमध्ये पाकीट शोधायला सांगितले. त्या गृहस्थांनी " काहीच्या काही सांगताय, चपलांच्या रॅकमध्ये कधी कोणी पाकीट ठेवेल का? " अशा नजरेने आमच्याकडे पाहिले. आम्ही म्हटले, " बघून तर या ना. नाही मिळाले तर पाहू प्रश्नकुंडली मांडून." ते नाईलाजाने घरी गेले. दोन मिनिटात पाकीट हातात घेऊन परतले.
त्यांची मुलगी आणि नात त्यादिवशी त्यांच्या घरी आले होते. त्यांची नात दोन अडीच वर्षाची चिमुरडी. तिने टिपॉय वर त्यांचे पाकीट दिसले ते घेऊन त्याच्याशी काहीवेळ खेळून चपलांच्या रॅकजवळ टाकले होते.
एकदा एका जातकाची जन्मलग्नशुद्धी करत असतांना त्याचे जन्मलग्न मकर आणि कुंभेच्या एकदम संधीवरचे मिळाले. म्हणजे मकर २९ अंश ५९कला ४२ विकला. मकर आणि कुंभ या दोन्ही शनीच्याच राशी. काही सेकंदाची चूक जन्मवेळेत झाली तर लग्न बदलून अख्खी पत्रिका बदलणार. रुलिंगवरून मकर लग्न असल्याचे अनुमान काढले पण मनात शंकेची पाल चुकचुकत होती.
तेवढ्यात टिव्हीवर जो कार्यक्रम चालू होता त्यात मगर धरण्याचे दाखवत होते. मकर राशीचे चिन्ह मगर आहे. ती मगर दिसल्यावर आमची खात्री झाली की याचे लग्न मकरच असणार. आम्ही तोच शकुन समजून मकर लग्नाची पत्रिका बनवली व त्यानुसार जातकाला त्याच्या गतआयुष्यातील काही घटनांबद्दल सांगितले. त्याने "हो हो" म्हणत त्या सर्वांना दुजोरा दिला.
एक दिवस सकाळी शिवाजी पार्कात मॉर्निंग वॉक संपवून घरी परतत असता, दादरमधलाच एक मुलगा रस्त्यात भेटला. त्याला परदेशात शिकायला जायचे होते. तिथल्या युनिव्हर्सिटीतून कॉल येईल का? अशा स्वरूपाचा प्रश्न तो विचारत होता. तेवढ्यात आमचे कुलकर्णी नावाचे मित्र समोरून एका टॅक्सीतून हातात बॅग घेऊन उतरतांना दिसले.
खरे तर ते आदल्या दिवशी सायंकाळी आम्हाला ते भेटले तेव्हा, " पंत, उद्या सकाळी सातच्या खारेपाटण गाडीने गावाला जातोय" असे म्हणाले होते. आम्ही घड्याळ पाहिले. पावणेआठ वाजले होते. कुलकर्णी आल्यावर म्हणाले की, " अहो पंत तुम्हाला म्हणालो होतो की आज जाणार आहे, पण उशीर झाला उठायला. कसाबसा आवरून निघालो. पण परळ डेपोला पोहोचेपर्यंत सव्वासात झाले होते. मी पोहोचण्याच्या आधी पाच मिनिटे मुंबई - खारेपाटण एसटी, परळ डेपोतून बाहेर पडली होती."
हा शकुन समजून आम्ही त्याला सांगितले की तू दोन दिवसांनी ये. आपण कुंडली मांडू. पण तुझे जाणे कठीण आहे असे वाटते. तो पुढे आला नाही. दोन दिवसांनी त्याला बर्मिंगहॅम युनिव्हर्सिटीकडून ईमेल आला ज्यात त्याला पीएचडीचा प्रवेश नाकारला होता.
त्याचे कारण दिले होते - Unreasonable Delay.
एके दिवशी आम्ही सहकुटुंब फिरायला गेलो असतांना सौभाग्यवतींनी "लोणावळ्याला चार दिवस जाऊन येऊ" असे सांगितले. तेथे त्यांच्या कंपनीचे रेस्ट हाऊस आहे. त्याचे बुकिंग मुंबईतूनच होते. हा विषय सुरू असतांना आम्ही फूटपाथवर चालत होतो आणि बाजूला बसस्टॉप वर एक बस थांबली होती आणि कंडक्टर काही प्रवाशांना,
"अहो जागा नाहीये. मागच्या गाडीने या. उतरा खाली. "
असे सांगत होता. ते प्रवासी उतरायला तयार नव्हते असा एकंदर सीन होता. आम्ही सौभाग्यवतींना सांगितले की, " तुम्ही म्हणताय त्या दिवशी लोणावळ्याला जाता येणार नाही. कारण रेस्ट हाऊस तेव्हा भरलेले असेल."
" तुमची कायम नरपटी असते." सौभाग्यवतींचे अपेक्षित उत्तर.
दुसर्या दिवशी ऑफिसात गेल्यावर चौकशी केली. रेस्ट हाऊस "फुल" आहे असे समजले. पुढे चार आठवड्यानंतरचे बुकींग मिळाले. ( कंडक्टरने सांगितले होते - मागच्या गाडीने या.)
एक बरे झाले की आमची प्रथम संधी हुकली आणि जाणे पुढे ढकलले गेले. कारण आम्ही टायगर पॉईंटवर गेलो तेव्हा तेथे
" ए दिल बता... ये तुझे क्या हुआ.. क्यूं है तू बेकरार इतना...
कहीं प्यार ना हो जाए... कहीं प्यार ना हो जाए"
या गाण्याचे शुटिंग सुरू होते. राणी मुखर्जीचे अत्यंत जवळून दर्शन झाले. जीवन सार्थकी लागले.
लोकहो,
तुम्हीही सभोवताली घडणार्या घटनांचा अन्वयार्थ लावण्याचा प्रयत्न करा. त्यातून तुम्हाला अनेक गोष्टी आणि सहस्ये उलगडतील. तुमचे अनुभव आम्हाला जरूर कळवा.
लेख खूप लांबला. इथेच थांबतो.
शकुनांबद्दल उर्वरीत पुन्हा केव्हातरी.
आपला,
(शोधक) धोंडोपंत
My comment:
असंबद्ध गोष्टीचा संबध लावणे हे लॉजिकल थिंकिंग नाहीच. उदाहरणार्थ जर एखादी घटना दोन जण पाहत आहेत आणि त्यानंतर एकाला चांगला व दुसर्याला वाइट अनुभव येतो.... तर मग शकुन कसे काय मानता येइल?
अशा प्रकारचे शकुनांचे न जुळणारे खुप उदाहरणं आहेत. मी प्रत्यक्ष पाहिलेत.
मात्र काही लोकांना फक्त जुळणारे प्रसंग अधिक लक्षात राहतात. माणसाचा स्वभावच आहे तसा. त्यामुळे सगळ्यांनी यापासून दूर राहणे योग्य.
आपल्या श्रद्धास्थानांत सावरकरही आहेत. एक निबंध येथे आहे : http://www.savarkar.org/content/pdfs/mr/vidnyan-nistha-nibandh-kh6-mr-v002.pdf
जरूर वाचावा.
No comments:
Post a Comment